Wednesday, 12 July 2017

लॉटरी

 

लिफ्टमधून बाहेर पडेपर्यंत तिच्या हातावरची त्याची पकड घट्ट झाली होती. तिचं काळीज धडधडू लागलं. घरी गेल्यावर आपली धडगत नाही हे तिला कळलं होतं. “मी खरच कधीच बोलले नाही तिच्याशी. लिफ्टमधे तिने hi केलं तेव्हा मी फक्त हसले” घरात शिरल्या शिरल्या तिने घाबरून सांगितलं. “खरंच?” संजयने उपहासाने विचारलं. तू क्वीन एलिझाबेथ आहेस ना! की तू बोलत नाहीस आणि लोकंच आपण होऊन तुझ्याशी बोलायला येतात.... इतकं, इतकं कठीण आहे एक सांगितलेली गोष्ट पाळणं? लोकांशी बोलू नको, बोलू नको कित्ती वेळा सांगितलंय!” चिडून तिच्या अंगावर ओरडत तो पुढे सरकला. तिच्या केसांना हिसका देऊन त्याने तिचं डोकं, केसांना धरून घट्ट पकडलं. “परत कोणाशी बोलताना दिसलीस तर तुला सोडणार नाही मी.” हिस्र श्वापदाच्या तावडीत सापडलेल्या हरणासारखी कांचन थरथरू लागली. तिचं ते घाबरण बघून खुनशी हसत त्याने तिला जमिनीवर ढकलून दिलं. तिला तसं लोटून तो दार लावून एकटा घराबाहेर निघून गेला.
     या महिन्यातली त्याच्या आक्रस्ताळेपणाची ही चवथी वेळ होती. तिच्या हातावरचे सिगरेटच्या चटक्यांचे डाग अजून फिकेही झाले नव्हते. कांचन कपड्यांनी अंगावरचे ठिकठिकाणचे वळ झाकत असे. झाकायचेही कोणापासून म्हणा! एकटीने बाहेर जायला तर तिला मज्जावच होता. संजय कामाला जाताना बाहेरून दार लॉक करत असे. भाजीपाला, किराणामाल आणायला तो तिच्या सोबत जात असे. कांचनच्या मनात विचार आला, लग्नाची बेडी आपल्यासाठी खरोखरीची बेडीच आहे. कोणत्या चुकीची शिक्षा भोगतोय आपण? आईवडलांनी ठरवलेल्या ठिकाणी लग्न करायला मुकाट्याने हो म्हटलं, लांब अनोळखी माणसाबरोबर लग्न नको असा विरोध नाही केला या चुकीची की आपले आईवडील भोळे आहेत, संजयची काही चौकशी न करताच त्यांनी विश्वास ठेवला या चुकीची! काय म्हणायचे बाबा नेहेमी “तो परमेश्वर नेहेमी वरून आपल्याला बघत असतो. लक्ष ठेवत असतो, काळजी घेत असतो.....” तिने मान वर करून बघितलं. वर घराच्या पांढर्या छताशिवाय काहीच दिसलं नाही. तिची नजर खिडकीकडे गेली. पंधराव्या मजल्यावरून खालचा रस्ता, त्यावरच्या गाडया खेळण्यांसारख्या दिसत होत्या. ‘नाही हो बाबा तो नाहीये वर. आणि असलाच तर त्याचं लक्षच नाहीये माझ्याकडे. त्याचं आकाश फार दूर आहे माझ्यापासून आणि माझी जमीनही सुटली.’ तिच्या गालांवरून आसवं वाहू लागली. पण पुसणारं कोणीच नव्हतं.
      महाराष्ट्राच्या नकाशावरही नसलेल्या छोट्याश्या गावात कांचन लहानाची मोठी झाली. वडिलोपार्जित जमिनीचा छोटासा तुकडा, त्यावर पिकवून त्यांचं कसंबसं चाले. गरिबी तिच्या घराच्या पाचवीलाच पुजलेली होती. पण तिचे आईवडील आहे त्यात संतुष्ट असत. चटणी भाकरी खाऊन आला दिवस साजरा करत. त्यांच्या गावात डांबरी रस्ता बांधण्याचं काम सुरु झालं. कंत्राटदार गावात आला. त्याने संजयचं स्थळ तिच्या वडलांना सांगितलं.  ‘फॉरेन’चा मुलगा ! नाते वाईक वगैरे काहीच लटांबर नाही. तुमची मुलगी राणी होईल, त्याने तिच्या वडलांना स्वप्नं रंगवून दाखवलं. आणि एरवी कदाचित ते इतक्या चटकन फसलेही नसते पण तो फकीर..... किती वर्षांपूर्वीची गोष्ट असेल ती.......
      कडक उन्हाळ्यातली ती दुपार होती. कांचन, आई, वडील आणि दोन बहिणींबरोबर जेवायला बसली होती. इतक्यात दारातून आवाज आला. “क्या भूखे फकीर को थोडा खाना मिलेगा?” वडलांनी त्यांच्या ताटातल्या एका भाकरीचे दोन तुकडे केले, एक तुकडा आणि त्यावर चटणी, हातांत घेऊन ते दारापाशी आले. वडलांच्या मागे शेपटासारखी तीसुद्धा दाराकडे आली. तिच्या वडलांनी फकिराला ती भाकरी दिली आणि विचारलं, “पानी चाहिये बाबा?” फकिराने मान डोलावली. “कांचन, बाबांना पाणी आण” त्यांनी कांचनला सांगितलं. कांचन आत जायला वळणार तोच त्या फकिराने तिच्याकडे बोट करून तिच्या वडलांना विचारलं, “आपकी बेटी है?” वडलांनी हो म्हणून मान हलवली. तिच्या चेहर्याकडे निरखून बघत फकीर म्हणाला, “इसकी तो लॉटरी आनेवाली है, बहुत पैसा आएगा, बहुत पैसा !!” कांचन तिथेच थबकली. तिच्या वडलांनाही हे अगदीच अनपेक्षित होतं. “आप ज्योतिष जानते हो बाबा?” त्यांनी फकिराला विचारलं. आणि लगेच तिला म्हणाले, “कांचन पाया पड त्यांच्या” आपण पाया पडलो तेव्हा काय बरं म्हणाला तो फकीर, अर्थही नीटसा कळला नव्हता....  
      त्या दिवसापासून बाबांना मात्र खरंच वाटायला लागलं की लॉटरी लागणार आहे. दर वेळी तालुक्याच्या गावी गेले की ते कांचनच्या हाताने एक लॉटरीचं तिकीट घेत. पण कधी बक्षीस लागलं नाही. संजयचं हे फॉरेनचं स्थळ आलं तेव्हा ते खूष होऊन ज्याला त्याला सांगायचे “बघा तो फकीर म्हणाला होता ती लॉटरी हीच. आमच्या सात पिढ्यांत कोणी मुंबईसुद्धा बघितली नाही. आणि आता आमची कांचन फॉरेनला जाणार. लॉटरी नाहीतर काय म्हणायचं याला ! नक्की हीच ती लॉटरी होती आणि मी वेड्यासारखा तिकीटं घेत बसलो”
      “ही लॉटरी?” हातावरच्या वळांवरून अलगद दुसरा हात फिरवून तिने स्वतःला विचारलं. बाबा कसे हो तुम्ही एवढे भोळे. तो फकीर वेडा, की मला एवढं लांब असं पाठवून देणारे तुम्ही वेडे, की काहीही कारण नसताना माझा असा छळ करणारा हा माझा नवरा वेडा, की हे सगळं चुपचाप सहन करणारी मी वेडी....
      बर्याच उशिरापर्यंत संजय आला नाही तेव्हा कांचन झोपून गेली. रात्री बर्याच वेळाने, चावीने दार उघडल्याचा आवाज आला. त्याचबरोबर दारूचा उग्र दर्प. संजय लडखडत खोलीत आला. देवा, आज नको...... आज नको..... कांचनने मनात देवाचा धावा सुरु केला. ती झोपल्याचं नाटक करून अंग चोरून तशीच पडून राहिली. तिच्या सुदैवाने तो बिछान्यात पडला आणि पुढच्याच क्षणाला घोरू लागला. तिची झोप मात्र मोडली ती मोडलीच. जुन्या गोष्टी तिला आठवू लागल्या. तिचं लग्नं ठरलं तेव्हा डॉक्टरकाका आणि प्रमिलाताई तिच्या घरी आले होते. हे पतीपत्नी म्हणजे सीतारामाची जोडी होती. ते गावात धर्मदाय दवाखाना चालवत. शिवाय गावात शिक्षणाबद्दल जागरूकता आणण्यासाठीही काहीनाकाही करत असत. प्रमिलाताई घरोघरी जाऊन बायकांशी बोलायच्या. त्यांना आहार, आरोग्य, स्वच्छता, कुटुंबनियोजन सगळ्याबद्दल नीट समजावून सांगायच्या. गावातली एक अनाथ मुलगी यांनी दत्तक घेतली होती. तर डॉक्टरकाका बाबांना सांगत होते, “तुम्ही मुलाची अजून माहिती काढायला हवी. त्याशिवायच कांचनला असं पाठवायचं म्हणजे..... त्यात तिला इंग्रजीही फारसं येत नाही. देव न करो पण तिला मदत लागली तर परक्या देशात ती कसं काय करणार?” “आपले कॉन्ट्रॅक्टर मिश्रा त्यांना ओळखतात ना. आणि आम्ही गरीब माणसं, परदेशात चौकशी करायला आमचं तिथे आहे कोण ! आज कांचन गेली तर उद्या पुढच्या पिढीचं सोनं होईल.....” बाबांनी त्यांचं ऐकलं असतं तर..... पण परदेशाच्या लॉटरीने त्यांना आंधळं केलं होतं.
     अंधारात चकाकणारे घड्याळाचे काटे बारा वाजल्याच दाखवत होते पण कांचनला झोप कशी ती नव्हती. कुठूनतरी विचित्र वास येत होता, ती उठून स्वयंपाकघरात गेली. तिथे सगळं ठीक होतं. वास कुठून येतोय कळेना. तिने खिडकीतून खाली बघितलं. रस्त्यावर बरीच गर्दी होती. लोक हातवारे करून काही सांगत होते पण काही ऐकू येत नव्हतं. घराचं दार उघडून बघावं का काय झालंय. पण तिची हिम्मत होईना. घाबरत, दबकत तिने हॉलची खिडकी थोडीशी उघडून ऐकण्याचा प्रयत्न केला. आता किंचाळ्याचे आवाज यायला लागले होते. फायर फायर.... म्हणून लोकांच्या ओरडण्याचे आवाज येत होते. ती पुरी गोंधळली. काय करावं, काय करावं, जळका वास वाढला होता. फार विचार करायला वेळ नव्हता. ती बेडरूम कडे वळली. संजय अजूनही घोरत होता. आजूबाजूच्या गोंधळाचा त्याला पत्ताच नव्हता. त्याला उठवायला तिने हात पुढे केला तशी तिच्या कुडत्याची बाही जराशी वर सरकली. त्याने दिलेला सिगरेटचा चटका त्या मंद प्रकाशातही दिसत होता. तिने एक वार आपल्या हातावरच्या वळांकडे पाहिलं, आणि मग झोपलेल्या संजयकडे. एक क्षण विचार करून ती उलट्या पावली मागे फिरली. बेडरूमचं दार तिने लावून घेतलं, आणि निघणार इतक्यात ती पुन्हा वळली, नुसतं आड असलेलं दार तिने घट्ट लावून घेतलं आणि त्याला बाहेरून कडी लावली. बंद दाराच्या या बाजूला असण्याची तिची ही पहिलीच वेळ होती.
    संजय कामाची कागदपत्रं बाहेरच्या कपाटातल्या कप्प्यात ठेवायचा हे तिने पाहिलं होत, तिने तो कप्पा उघडला, त्यात तिचा पासपोर्ट समोरच होता तो उचलला आणि ती घराबाहेर जिन्याकडे धावत सुटली. किंचाळ्या, आरडाओरडा, रडणं, कुंथण कसकसले आवाज येत होते पण ती पळत सुटली. आपण आगीपासून पळतोय की संजयपासून.... कुठे जायचं, कसं जायचं, पण पहिल्यांदी या इमारतीतून बाहेर पडायला हवं. मग पुन्हा भारतात जाऊ. आई बाबांकडे. ते कधीच आपल्याला टाकणार नाहीत. आपण निघतानाही ते आपल्याला म्हणाले होते “हे घर नेहेमी तुझंच आहे. काही काळजी करू नकोस, ‘तो’ वरून बघतो आहे, ‘तो’ सगळी काळजी घेईल.” एव्हाना ती तीन माजले खाली आली होती. ‘तो’ वरून बघतो आहे.... ‘तो’ वरून बघतो आहे.... म्हणजे मी आत्ता संजयला वर कोंडून आले तेसुद्धा त्याने बघितलं का? त्याला खरच सगळं दिसतं का? मग माझे हाल होतात तेव्हा?.... तो काहीच कसा करत नाही.... धूर वाढत होता, तिच्या नाकातोंडात धूर जात होता, तिला काही कळेनासं झालं..... फक्त वडलांचं “’तो’ बघतो आहे..... ‘तो’ बघतो आहे.....” वाक्य तिच्या डोक्यात ठाण ठाण वाजू लागलं. असह्य हौऊन तिने दोन्ही हातानी कान दाबले आणि ती उलट पुन्हा वर तिच्या फ्लॅटच्या दिशेने धावू लागली. पळत पळत ती घरात आली. बाहेरचा दरवाजा तिने उघडाच टाकला होता. ती धावत बेडरूमकडे गेली. आतून संजय जोरजोरात ओरडत होता. “दार उघड हरामखोर...... दार उघड, मरेन मी......” तिने कडी काढली त्याबरोबर तो पिसाळलेल्या जनावरासारखा बाहेर आला. बाहेर येऊन खाडकन त्याने तिच्या गालवर जोरदार थप्पड दिली आणि तो दरवाज्याकडे धावला. ती त्याच्या मागे. आता धूर चांगलाच वाढला होता, ते जिन्याच्या दिशेने निघाले एवढ्यात अग्निशमन दलाचा एक फायर फायटर वर आला. त्याने संजयला सांगितलं की आगीने जिन्याचा रस्ता बंद झाला होता, फायर एस्केप (आपत्कालीन मार्ग) म्हणून बिल्डींगच्या मागच्या बाजूला शिडीसारख्या पायर्या होत्या त्यावरून खाली जावं लागणार होतं. ते तिघे बिल्डींगच्या मागच्या बाजूच्या शिड्यांवरून खाली जाऊ लागले. पुढे तो फायर फायटर , मधे ती आणि मागे संजय. आग आता चांगलीच पसरली होती. इमारतीत ठिकठिकाणी आगीने पेट घेतला होता. इथल्या घरांच्या बांधकामात लाकूड खूप वापरतात त्यामुळे आगीचा धोका असतो हे कांचनने ऐकलं होतं पण त्याचं एवढं रौद्र रूप बघायची वेळ येईल असं तिला स्वप्नातही वाटलं नव्हतं. आता ते दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले होते. संजय अजूनही खवळलेलाच होता. “मला कोंडून काय पळून चालली होतीस, you...xxxxx” असं म्हणून त्याने पुढे शिडी उतरणार्या कांचनला एक सणसणीत लाथ मारली. कांचन भेलकांडत पुढे असणार्या फायर फायटर वर जाऊन आदळली. त्या दोघांनीही दचकून मागे पाहिलं. इतक्यात वरच्या मजल्यावरून आगीने पेटलेला एक मोठा लाकडी खांब खाली कोसळला आणि त्यांच्या डोळ्यांसमोरच संजयच्या अंगावर पडून त्याच्यासकट खाली गेला.
     कांचन दवाखान्यात प्रमिलाताईच्या समोर बसली होती. तिच्या हातात एक लिफाफा होता बाहेरून आलेला. तिने तो ताईपुढे केला. “हे काय आहे?” त्यांनी विचारलं. “लॉटरी.... संजयच्या कंपनीने त्यांच्या सगळ्या लोकांचा विमा काढला होता. एक लाख पौंडांचा चेक आलाय माझ्या नावाने. आगीत खूप जणं गेली, सगळ्यांच्या बॉडी सापडल्या नाहीत, ओळखता आल्या नाहीत. पण संजयची बॉडी सापडली आणि फायर फायटरने साक्ष दिली म्हणून माझा चेक लवकर आला.” प्रमिलाताईनी कांचनच्या हातावर थोपटलं. “कांचन, तू खूप हिंमतीची आहेस. ह्या पैशांसाठी तालुक्याच्या बँकेत खातं उघडून देऊ तुला?” “नाही ताई, एवढ्या पैशांची आम्हांला गरजच नाही. आईबाबांना म्हातारपणासाठी पुरतील एवढे पैसे ठेवीन मी पण बाकी सगळे पैसे चांगल्या कामाला वापरले जाऊदेत. बाबासुद्धा हो म्हणालेत. तुम्ही सांगा कसं करायचं ते” प्रमिलाताई अवाक झाल्या. त्या म्हणाल्या, “हे बघ बाळा, आत्ता, तुला धक्का बसलाय. अशा वेळी मोठे निर्णय न घेणं चांगलं. थोडा वेळ जाऊदे. मग शांत चित्ताने ठरव.”
“शांत?.... शांत कधी वाटणार मला ताई? झोप लागत नाही, लागली तरी कधी मला मारणारा, छळ करणारा संजय डोळ्यांसमोर येतो. कधी आग डोळ्यांसमोर येते, ती जळकी प्रेतं, ते कळवळणारे, रडणारे लोक डोळ्यांसमोर येतात. आगीने पेटलेला, दहाव्या मजल्यावरून खाली पडणारा संजय डोळ्यासमोर येतो आणि आठवतं की मी त्याला तिथे जळून जायला कडी लावून जाणार होते” कांचन उद्रेकाने थरथरत होती. “पण माझी चूक नाहीये, ‘तो’ वरून बघत होता, मी कडी काढली, मी कडी काढली.....” ती हमसाहमशी रडू लागली. “तुझी चूक नाहीये बाळा, तुझी चूक नाहीये, उलट तू किती भोगलयस.” प्रमिलाताई हळवं होऊन म्हणाल्या.
“मग आता संपूदे ताई. मला शांती मिळू दे. तुम्ही माणसांपासून प्राण्यांपर्यंत सगळ्या गावाची काळजी घेता. तुमच्या कामात मला देव दिसतो. माहितीये ताई, त्या फकिराला पाया पडले तेव्हा तो मला काय म्हणाला होता...”
“ते लॉटरीचं?”
“हो लॉटरीचं, पण नंतर अगदी हलक्या आवजात त्याने मला सांगितलं लॉटरी तो लगेगी, बहोत पैसा मिलेगा, लेकीन बेटा सुकून पैसेसे नही, इबादत से मिलेगा”  
 (* इबादत = उपासना)

डॉ. माधुरी ठाकुर  


Monday, 3 July 2017

तळ्याकाठी

तळ्याकाठी
“तू तर नेहेमी त्याचीच बाजू घेणार. तुला सांगण्याचाही काय उपयोग ! तरी तुला बजावतोय मी, माझ्या करीअरमधे तो ढवळाढवळ करतो तेवढी पुरे, पण आता माझ्या पर्सनल लाईफमध्ये जर त्याने नाक खुपसलं तर मोठा भाऊबिऊ सगळं मी विसरून जाईन.” त्याने आईला निक्षून सांगितलं.
“अरे पण चिंटू,” आई समजावणीच्या स्वरात सांगू लागली. “चिंटू म्हणू नको मला, हजारदा सांगितलाय, राजस म्हण. ओजसला कसं बरोबर ओजस म्हणतेस. मी काय आयुष्यभर चिंटूच रहायचं का?” राजसने चवताळून विचारलं.
“बरं, बरं, चुकलंच माझं! पण राजस, दादा नव्हता गेला त्यांच्याकडे. तुझ्या मैत्रिणीचे वडीलच येऊन बोलले त्याच्याशी, तुझ्याबद्दल. ते विचारत होते की तूसुद्धा दादाला जॉईन होणार आहेस का म्हणून. सगळे तुझ्या चांगल्याचाच विचार करतायत. ओजस तुला मदतच करतोय. तुला कळत कसं नाही!”
       “आई, तुला कसं कळत नाही की मला सतत त्याच्या हाताखाली, त्याच्या छायेत नाही रहायचंय. मला नकोय त्याची मदत. माहितीये तो खूप मोठाय आणि तुला केवढा अभिमान आहे त्याचा. आणि मी हा असा. पण तरीही मला त्याची मदत नकोय, तो नकोय आणि तूही नकोयस” तिरमिरीत दार धाडकन आपटून राजस घराबाहेर पडला. त्याने बाईक स्टार्ट केली. दोनतीनदा किक मारली पण ती स्टार्ट होईना. वैतागून त्याने बाईकला एक लाथ मारली. “तूसुद्धा त्यांच्यासारखीच! दादाने किक मारली की बरोबर स्टार्ट होशील” असं म्हणत चिडून त्याने जोरात परत एक किक दिली. नशिबाने या वेळी ती स्टार्ट झाली. तो भन्नाट वेगाने निघाला. दिशा नव्हती, कुठे जायचं ठरवलं नव्हतं. फक्त इथून लांब... खूप लांब... तो जातच राहिला.
      शहरापासून तो बराच लांब आला होता. मधेच भलतच वळण घेतलं बहुतेक कारण डांबरी रस्ता संपून आता कच्चा रस्ता लागला होता आणि आजूबाजूला गर्द झाडी. आपण कुठे आलो कुणास ठाऊक, एवढं लांब असं जंगलात यायला नको होतं असा विचार त्याच्या मनाला चाटून गेला. हः घाबरण्यासारखं काय आहे, वाघ सिंह आजकाल असतात कुठे! खरी भीती तर माणसांचीच आहे. लोकांपासून दूर असलं तर काय घाबरायचं. उलटसुलट विचार करत तो थकून थांबला. हेल्मेट काढलं. बाईक उभी करून तो आसपास पाहू लागला. थोड्याच अंतरावर मोठमोठ्या वृक्षांनी लपवून ठेवल्यासारखं एक छानसं तळ होतं. मस्त पिकनिक स्पॉट आहे की हा! मुग्धाला घेऊन इथे यायला हवं. राजसच्या मनात विचार आला. पण लगेचच आपल्या भावाकडे गेलेले मुग्धाचे बाबा त्याच्या डोळ्यासमोर आले. “म्हणे मी दादाला जॉईन करणार आहे का! नाही केलं तर काय मुलगी देणार नाही का मला! मी काय कमी आहे का? वेळ तर द्या मला सेटल व्हायला. घाई काय आहे एव्हढी... मुग्धाने त्यांना दादाकडे जाऊच कसं दिलं. सांगायचं ना नका जाऊ म्हणून. घाबरट आहे नुसती!”
     मुग्धाचे विचार झटकून तो तळ्याकडे गेला. तळ्याच्या पाण्यात हातपाय धुऊन फ्रेश होऊन तो परत बाईक कडे आला. हेल्मेट घालत त्याने बाईकला किक मारली. पुन्हा तेच. बाईक स्टार्ट होईना. त्याने खिशातून मोबाईल काढला पण नेटवर्क नव्हतं. सगळ्या जगाने आपल्या विरुद्ध कट केलाय असं त्याला वाटू लागलं. त्याने हेल्मेट भिरकावून दिलं, बाईकला एक लाथ मारली, बाईक खाली पडली. वैतागून तणतणत तो तळ्याकाठी जाऊन बसला. बसल्याबसल्या त्याने पाण्यात खडे टाकायला सुरुवात केली. पाण्यात असंख्य तरंग उठत होते तसेच त्याच्या मनातही असंख्य विचार येत होते. “काय आयुष्य आहे हे. सक्सेसफुल मोठा भाऊ असणं म्हणजे शापच आहे. आईचं त्याच्यावरच जास्त प्रेम आहे. त्याचाच तिला अभिमान वाटतो. नेहेमी कशी म्हणते, ‘ओजस कसा वाढला मला कळलं सुद्धा नाही, राजसने मात्र खूप त्रास दिला. जागरणं काय, आजारपणं काय....’ म्हणजे मी आजारी पडायचो हीसुद्धा माझीच चूक आहे!! सारखं आपलं ओजस, ओजस, ओजस, ओजस.... आणि आता तर कहरच. माझ्या गर्ल फ्रेन्डचा बाप सुद्धा ओजसला जाऊन विचारतो की मी त्याची लॉ फर्म जॉईन करणार का! अरे नाही करत जा.... त्याच्याशीच लग्न लाऊन दे तुझ्या मुलीचं...” वैतागून त्याने एक खडा तणतणून पाण्यात टाकला. तो पाण्यात पडतोय एवढ्यात अजून एक दगड पाण्यात खूप आत, दूरवर जाऊन पडला. हा कोणी टाकला म्हणून राजसने चमकून मागे बघितलं. त्याच्या मागे काही अंतरावर एक जण उभा होता. उंचपुरा, एखाद्या अॅथलीट सारख्या शारीर यष्टीचा, काळ्या सावळ्या रंगाचा तो मनुष्य हसत हसत पुढे आला. एवढ्या दुरून याचा दगड पाण्यात एवढ्या लांबवर कसा गेला असा आश्चर्याचा भाव राजसच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. “अरे मी रोजच दगड फेकत असतो. प्रॅक्टिस आहे मला” राजसच्या चेहऱ्यावरचं प्रश्न चिन्ह पाहून तो उत्तरला आणि येऊन राजसच्या बाजूला थोड्या अन्तरावर बसला.
“मी श्याम” त्याने हात मिळवण्यासाठी पुढे केला.
“मी राजस” राजासने हात मिळवला आणि खरं तर अनिच्छेनेच उत्तर दिलं. त्याला इथे ओळख वाढवून गप्पा मारत बसायची जराही इच्छा नव्हती.
“मग....” श्यामने प्रश्नार्थक नजरेने राजस कडे पाहात विचारलं.
“मग काय?” राजसने वैतागून विचारलं.
“अरे प्रॉब्लेम काय आहे?”
ह्याच्या आगाऊ पणावर चिडावं की हसावं राजसला कळेना. वरवर तो फक्त “कसला प्रॉब्लेम” एवढंच म्हणाला.
“तू तिथे हेल्मेट फेकलयस, बाईक पाडलीयेस आणि इथे एकटा पाण्यात खडे टाकत बसलायस. तुझा रोजचा कार्यक्रम हाच असेल असं तर वाटत नाही. काहीतरी बिनसलं असेल म्हणून इथे येऊन असा बसला असशील.” श्याम म्हणाला.
“असं काही नाहीये. रस्ता चुकलोय मी. आणि समजा असताही काही प्रॉब्लेम तरी मी तुला कशाला सांगेन?” राजसने विचारलं.
“अरे, ओळखीच्यांपेक्षा अनोळखी माणसाला प्रॉब्लेम सांगणं सोपं असतं. कारण ते आपल्याला judge करतील अशी धास्ती नसते. मन हलकं होतं आणि कधी कधी तटस्थ भूमिकेतून परिस्थिती पाहिली की ती जास्त व्यवस्थित समजते, अॅनलाइज करता येते, उपायही सापडतो.”
“तू काय सायकियाट्रिस्ट आहेस का?” राजसने विचारलं.
“नाही रे. माझा दुधाचा बिझनेस आहे. जवळच फार्म आहे माझं. माझं जाऊदे. तू बोल. मन मोकळं कर, तुला बरं वाटेल. मग मी तुला इथून बाहेर पडायचा रस्ताही दाखवतो.”
      भलताच आगाऊ आहे हा पण रस्ता माहितीये याला, आणि काय हरकत आहे बोलायला, राजस विचार करू लागला, साधारण ओजस च्याच वयाचा वाटतो. कदाचित थोडासा मोठा. आणि डोळे तर अगदी आईच्या सारखेच आहेत. आश्वासक, हा चांगला माणूस आहे असं सांगणारे. छ्याः आई आणि दादा कितीही दूर असले तरी आपल्या डोक्यातून जातच नाहीत. जाऊदे, बोलावं याच्याशी. नाहीतरी दुसरं काय काम आहे. बाईक बंद पडलीये. मदत तर हवीच आहे आपल्याला असा विचार करून राजसने बोलायला सुरुवात केली. “प्रॉब्लेम असा काही नाहीये. म्हणजे बाईक बंद पडलीये ते आहेच पण खरा त्रास वेगळाच आहे. आमच्या घरी मी, आई आणि दादा. मी जुनिअर कॉलेजला असताना बाबा गेले. मी लॉ करतोय. मोठा भाऊ ओजस माझ्यापेक्षा आठ वर्ष मोठा आहे. त्याची मोठी एस्टॅब्लिश्ड लॉ फर्म आहे. तो सगळ्या दृष्टीने चांगला, अगदी सरस आहे. लहानपणा पासूनच. शाळेत हुषार. कॉलेजमध्ये टॉपर आणि आतासुद्धा अगदी व्यवस्थित सेटल्ड! आणि मी आपला साधारण. सहाजिकच आईला तोच जास्त आवडतो. ती त्याचच सगळं ऐकते, त्याचीच बाजू घेते. मला हे असं सेकंड रहायचा अगदी कंटाळा येतो, वैताग येतो, संताप येतो....” राजसचा आवाज चढत गेला होता.
“असं आहे तर” श्याम लक्षपूर्वक ऐकत होता.
“ओजस खरच चांगला आहे. तसा मला आवडतो. तो जास्त हुषार आहे, मेहेनती आहे पण आईचं मुलांवरचं प्रेम हे irrespective ऑफ these things असलं पाहिजे ना! सारखी काय त्याचीच बाजू घ्यायची? तो जास्तच लाडका आहे तिचा” राजस निराश होऊन म्हणाला.
“बरेचदा काय होतं माहितीये राजस, आपण आईवडलांकडून परफेक्ट वागण्याची अपेक्षा करतो. आई म्हटलं की तिला न बोलता समजलं पाहिजे वगैरे. त्या घोळात आई, वडील हेसुद्धा हाडामासाची माणसंच आहेत हे आपण विसरतो. तू अजून लहान आहेस म्हणून तुला कळायला थोडं कठीण आहे. पण स्वतःला मुलं झाली की आपण त्यांच्या बाबतीत किती क्षमाशील असतो. त्यांच्या किती गोष्टी पोटात घालतो. वाईट वाटून घेत नाही, राग धरत नाही. पण तेच आपण, आपल्याशी अश्याच वागणार्या आईवडलांशी मात्र तसे वागत नाही. त्यांची प्रत्येक चूक, आपल्या दृष्टीने असलेली चूक आपण मनात धरून ठेवतो. आता तुझ्या बाबतीत म्हणायचं झालं तर दोन शक्यता आहेत. एक म्हणजे खरोखरीच तू म्हणतोस तसं तुझा भाऊ तुझ्या आईचा जास्त लाडका आहे आणि दुसरी शक्यता म्हणजे खरं तर असं नाहीये पण तुला असं वाटतंय”
“मला वाटतंय म्हणजे? मी काय वेडा आहे का उगीचच काहीही वाटून घ्यायला?” राजसने वैतागून विचारलं.
“तसं नाही रे मित्रा. आता बघ, जेवताना आई मोठ्या मुलाला दोन पोळ्या वाढते आणि छोट्याला एक. यात काही मोठ्यावर प्रेम जास्त आहे असं काही नसतं. त्यांची भूक जेवढी आहे असं तिला वाटतं त्याप्रमाणे ती देत असते. इक्वॅलिटी (सर्वांना सारखंच) आणि इक्विटी (सर्वांना पण प्रत्येकाला त्याच्या गरजेइतकं) असं कॉलेजमधे शिकल्याचं आठवतं का?” श्याम हसून पुढे बोलत राहिला, “आणि शिवाय यात ‘तिला वाटतं त्याप्रमाणे’ हेसुद्धा महत्वाचं आहे. ती तिच्या अंदाजाप्रमाणे हे आडाखे बांधत असते की याला कशाची किती गरज आहे आणि त्याला किती. पण मनुष्य म्हटला की अंदाज चुकण्याची शक्यता आहेच ना! पण या गोंधळात धाकट्याला असं वाटू शकतं की मला आई एकाच पोळी देते आणि दादाला दोन, दादा जास्त लाडका आहे.”
“तसं नाहीये रे” राजस आता अगदी मोकळेपणाने बोलू लागला होता, “आम्हाला दोघांनाही सर्व गोष्टी व्यवस्थित मिळतात. दादा तर स्वतःच कमावतो पण मलाही सगळं भरभरून मिळतं. प्रॉब्लेम गोष्टी मिळण्याचा नाहीये. आई त्याचंच सगळं ऐकते. तो म्हणेल ती पूर्व दिशा. आता बघ, त्याची लॉ फर्म आहे. तो कॉर्पोरेट लॉयर आहे. मला क्रिमिनल लॉ मधे इंटरेस्ट आहे. पण हा सांगतोय मला जॉईन हो. आईसुद्धा त्याचंच ऐकते आणि तेच सांगते. माझ्या म्हणण्याला कोणी भावच देत नाही. त्याच्या प्रत्येक म्हणण्याला करते तसा सपोर्ट तिने मला करावा, तसा रिसपेक्ट तिने मलासुद्धा द्यावा असं मला वाटतं आणि तो मला मिळत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे”
“हुषार आहेस तू. किमान आपला प्रॉब्लेम काय आहे हे तरी तुला नीट समजलंय. अनेकांचं आयुष्य जातं पण त्यांना स्वतःला काय हवय नि काय खुपतंय हेच त्यांचं त्यांना कळत नाही. पण मित्रा हे सपोर्ट आणि रिसपेक्ट जे म्हणालास ना त्या फार कठीण गोष्टी आहेत. मागून मिळत नाहीत. कमवाव्या, अर्न कराव्या लागतात.”
“कमवेनच रे मी. पंचविशीसुद्धा नाही झाली अजून माझी. पण तोपर्यंत? असाच भांडत राहू का सगळ्यांशी?” राजसने विचारलं.
“तो ढग बघ” श्यामने वर आभाळाकडे बोट केलं. राजसही वर बघू लागला. “समजा तू मुग्धाला भेटायला चालत निघालायस आणि असा मोठा काळा ढग आकाशात आला तर तू काय करशील?”
“मी जॅकेट किंवा छत्री घेईन.”
“का तू छत्रीने ढगाशी मारामारी करणार का?” श्यामने हसून विचारलं.
“काय रे तुला भेटलं नाही का कोणी सकाळपासून! ढगाशी मारामारी म्हणे! माझं डोकं भिजू नये म्हणून माझ्या डोक्यावर धरायला छत्री”
“तेच तर राजस!! बाकीचे आपल्याशी कसे वागतात, काय म्हणतात हे त्या काळ्या ढगासारखंच आहे. आपल्या नियंत्रणाबाहेर आहे. तो ढग, त्याला वाटलं तर बरसेल नाहीतर वार्याने दुसरीकडे कुठे जाईल आणि तिथे बरसेल. आपल्याकडे आपली छत्री हवी. आपली छत्री म्हणजे काय सांग?”
“काय”
“आपली छत्री म्हणजे आपला स्वतःवरचा ठाम विश्वास. तो असेल आणि प्रयत्न करण्याची तयारी असेल तर अशा पावसाचा मारासुद्धा तुझं डोकं भिजवू शकणार नाही. आईशी, भावाशी जरूर मोकळेपणाने बोल, तुला कसं वाटतं ते त्यांना मोकळेपणाने सांग, त्यांची बाजूसुद्धा समजून घे. नात्यांमध्ये मोकळेपणा, संवाद, सुसंवाद हवाच पण फक्त त्याने तुझा प्रश्न सुटेल अशी आशा मात्र ठेऊ नकोस. आपल्या बर्याच प्रश्नांचं मूळ हे आपल्या मनाच्या आतच असतं. म्हणून खरा संवाद हा आपला स्वतःचा स्वतःशीच असला पाहिजे. आईचा लाडका ही नंतरची गोष्ट झाली, तू स्वतः स्वतःचा लाडका आहेस का? असशील तर इतरांचा लाडका आहेस की नाही याने फारसा फरक पडता कामा नये. इतरांच्या बोलण्यामुळे तू स्वतः स्वतःवर शंका घेत नाहीयेस ना? सगळ्या कोलाहलात आपला आतला आवाज हरवूनच जातो. आपण स्वतःशी संवाद करतच नाही. तसा केलास तर तुला कळेल की आईची, भावाची पद्धत चुकीची असेलही, कदाचित त्यांचा सल्लाही चुकीचा असेल पण त्यांचा हेतू मात्र चांगलाच आहे, तुझं हित हाच आहे. तुझ्या ध्येयासाठी भरपूर प्रयत्न कर, यशस्वी हो पण त्यांना धडा शिकवण्यासाठी नाही तर तुझी तेव्हढी क्षमता आहे म्हणून. कारण राजस चुकीच्या पद्धतीने का होईना ते तुला मदत करण्याचाच प्रयत्न करताहेत.”
“हे असं इथे जंगलात तळ्याकाठी बसून असं बोलणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात कोणी तुमच्या मनाविरुद्ध वागलं, राग येईल, वैताग येईल असं बोललं की हे छत्रीवालं तत्वज्ञान सुचत नाही.” राजस सहजा सहजी बधणार्यांतला नव्हता.
“सराव राजस, प्रॅक्टिस!! माझा खडा पाण्यात लांब का गेला? सराव.... जाणीवपूर्वक मनाला ताब्यात ठेवण्याचा सराव कर. राग करण्यात मनाची जी शक्ती वाया घालवतोस ती प्रयत्न करण्याकडे वळाव. Let your actions speak for you.
राजसने हसून मान डोलावली.
“चल रस्ता दाखवतो तुला” दोघे चालत बाईक कडे आले.
“अरे यार..... ही तर बंद पडली आहे” राजस आठवून म्हणाला.
“बघू, चावी दे”
राजसला आठवलं, वैतागून सगळी फेकाफेक करताना चावीसुद्धा फेकली असणार. तो जमिनीवर पाल्यापाचोळ्यात चावी पडलीये का बघू लागला.
“पुन्हा तेच, सगळा शोध बाहेर! आत बघ!! सगळी फेकाफेक करण्या आधी तू सवयीने चावी जीन्सच्या खिशातच टाकली होतीस ना?”
राजसने बघितलं तर खरच चावी खिशातच टाकली होती की! हायसं वाटून त्याने चावी श्यामला दिली. श्यामने एक किक मारली आणि बाईक चालूही झाली.
“भारीच टेम्परामेन्टल झालीये ही” राजस उद्गारला.
“तुझीच बाईक!” श्यामने हसून म्हटलं, “ऐक, ते समोर मोठ्ठं झाड दिसतंय ना तिथून डावीकडे वळलास की कच्चा रस्ता लागेल. त्यावर साधारण पाच मिनिटं गेलास की पक्का रस्ता दिसेल. त्यावर उजवीकडे वळ की तुझ्या शहराकडे जाशील.
“तुला सोडू तुझ्या फार्मवर?”
“तू हो पुढे. मी थोडा वेळ थांबणार आहे” म्हणून श्यामने राजसच्या खांद्यावर थाप दिली.
“थॅंक्स श्याम, बरं वाटलं तुझ्याशी बोलून.”
“काळे ढग आले तर लक्षात ठेवशील ना?” श्यामने हसून विचारलं.
“नक्की!!” राजस हसून उत्तरला. दोघांनी हात मिळवले आणि राजस निघाला.

सकाळी चिडून निघून गेलेला राजस संध्याकाळ झाली तरी आला नव्हता. त्याच्या आईच्या डोळ्यांना धार लागली होती. देवघरासमोर बसून ती माऊली मनोमन आळवत होती, “कृष्णा, तुला देवकीचं प्रेम कळलं आणि यशोदेचंही. माझ्या बाळाला मात्र माझं प्रेम कळत नाहीये रे. त्याची काळजी घे. त्याला सुखरूप घरी आण”

राजस निघाला. त्याने वळण घेतलं. समोर खरंच डांबरी रस्ता होता आणि त्याच्या शहराच्या दिशेने जाणारी पाटी. श्यामने बरोबर रस्ता सांगितला होता तर... आईबद्दलही तो बरोबर म्हणाला. तिचं थोडसं चुकत असलं तरी तिचं प्रेम सारखंच आहे दोघांवर. मी नेहेमी उलटं धरून चालतो म्हणून.... मुग्धासुद्धा तेच म्हणते. आणि काय म्हणाला तो, मुग्धाला भेटायला जायचं असेल आणि काळा ढग आला तर..... wait a minute.... मुग्धाबद्दल तर मी त्याला काही म्हटलंच नाही. मुग्धाचं नाव त्याला कसं कळलं! आणि चावी... चावी मी ठेवताना तर तो तिथे नव्हताच. त्याला कसं कळलं! कसं कळलं !! राजस चांगलाच गोंधळला. श्यामला शोधायला त्याने बाईक मागे वळवली. तो पुन्हा तळ्याकाठी आला. पण श्याम दिसला नाही. ते बसले होते त्या जागी एक मोरपीस मात्र होतं.

डॉ. माधुरी ठाकुर 


Monday, 12 June 2017

पारिजात

 

सुन्न मनाने तिने फोन ठेवला. समोरच्या टेबलवर ठेवलेला चहा केव्हाच थंड झाला होता, त्याखालचा सकाळचा पेपर फडफडत होता पण तिला काही सुचत नव्हतं. हुंदकाही येत नव्हता. आतून थिजल्या सारखी ती गोठून गेली होती. अण्णा जाणार हे निश्चितच होतं. त्यांचं वयही झालं होतं. होणार हे माहीत असलं तरी प्रत्यक्षात झाल्यावर गोष्ट मनाला चटका लावून जाते. गायत्रीचही तसंच झालं. अण्णांच्या मागोमाग तिच्या मनात विचार आला माईचा. माई कशी असेल? सावरली असेल का? तिने चटकन माईला फोन लावला. पण कोणी फोन उचललाच नाही.

     माईशी बोलल्यालासुद्धा आता बरेच महिने होऊन गेले होते. दिवाळीत केला होता का शेवटचा फोन, आणि मध्ये एकदा अण्णांच्या तब्बेतीची चौकशी करायला केला होता ना? ती आठवू लागली. गेल्या दीड वर्षात तिच्या स्वतःच्याच आयुष्याची घडी इतकी विस्कटली होती की ती पुन्हा बसवताना या सार्या गोष्टी राहूनच गेल्या होत्या. त्यात माई, अण्णा हे हक्क गाजावणार्यान्पैकीही नव्हते की रुसवे फुगवे धरणार्यान्पैकी. आणि मुंबईला आईबाबांना फोन केला की त्यांची खुशाली कळतच होती की! आता मात्र नुसता फोन नाही तर माईला भेटायलाच जायचं असा तिने निश्चय केला.

     आज रात्रीच अमितशी बोलून तिकिटं बुक करूया असा विचार पक्का केला केला तव्हा कुठे गायत्रीला जरा बरं वाटलं. तिची नजर घडाळ्याकडे गेली. सौम्याला नर्सरीतून आणायची वेळ झाली होती. म्हणजे आजसुद्धा योगा राहीलाच की. काल रात्रीच अमित हसत हसत तिला म्हणाला होता, “योगाबिगा करत जा मॅडम, वजन वाढतंय तुमचं!” त्याच्या त्या हसत हसत मारलेल्या शेर्यामुळेसुद्धा ती दुखावली गेली होती. मुंबईत योगा इन्स्ट्रक्टर म्हणून तिचा बिझनेस नावारूपाला येत होता. रेग्युलर क्लासेस, ट्युशन्स, एखाद दोन सेलिब्रिटी क्लायन्ट्स असा तिचा जम बसू लागला होता. तिचे आईवडील जवळच रहात असल्यामुळे सौम्याचीही व्यवस्थित काळजी घेतली जात होती. पण दीड वर्षापूर्वी अचानक अमितला ही मोठी संधी चालून आली. त्याची कंपनी कार्नाटक मध्ये बिझनेस वाढवण्याचा प्रयत्न करत होती. तिथल्या ऑफिसमधे त्याने जावं आणि ते काम बघावं अशी त्याला वरून सूचना आली.

     “बँगलोर वगैरे ठीक होतं रे, पण हे नल्लूर अगदी कुठच्या कुठे आडगाव आहे!” गायत्री नाखुषीने म्हणाली, “सौम्याचं काय? तिची शाळा?”

“अगं आपल्याला काही तिकडे कायमचं नाही रहायचंय. दोन वर्षांचाच प्रश्न आहे. सौम्या तर लहानच आहे अजून.”

“ते खरय रे पण मला माझे क्लासेस बंद करावे लागतील”

“आय नो..... पण तू तिथेसुद्धा पुन्हा सुरु करू शकतेस ना? आणि बघ ना मी मिडल मॅनेजमेंटवरून हायर मॅनेजमेंटच्या ब्रॅकेटमधे जातोय. फक्त माझ्या करीअरच्याच नाही तर पैशांच्या दृष्टीनेसुद्धा आपल्याला किती चांगलं आहे!” अमितचं म्हणणं खरं होतं. पैशांच्या दृष्टीने चांगलं होतं यात काहीच वाद नव्हता.

“नाहीतर असं करायचं का? तू जा, मी आणि सौम्या दर महिन्याला येऊन तुला भेटत जाऊ किंवा तू अधून मधून येत जा इथे” तिने सुचवून पाहिलं. “चल्, तुला आणि सौम्याला सोडून नाही जाणार मी. जायचं तर एकत्र, नाहीतर मी नाही म्हणून कळवून टाकतो.” अमितच्या या म्हणण्यावर गायत्री वरवर वैतागली तरी मनातून खरतर ती सुखावली होती. नकार कळवणं शक्य असलं तरी प्रायव्हेट कंपन्यांमधे असे नकार पचवले जात नाहीत याची अमित आणि गायत्रीलासुद्धा पूर्ण कल्पना होती.

      हो ना करत तिघे या नवीन गावी आले. गायत्रीला वाटलं होतं त्यापेक्षा सौम्या नल्लूरला फारच चटकन रुळली. अमितसुद्धा कामामुळे बिझी झाला. राहिली गायत्री. घर शोधा, शाळा शोधा, बाजारहाट, दुकानं शोधा यात सुरुवातीचे काही महिने पटकन गेले. त्यांच्या या नव्या घराच्या आसपास रहाणारे सगळे लोक कन्नडच होते. स्थानिक भाषा समजावी, बोलता यावी म्हणून गायत्रीने पुस्तकं आणून कन्नड भाषा शिकायला सुरुवात केली. कामापुरते शब्द यायला लागले असले तरी संवाद करण्याएवढी कन्नड भाषा तिला अजून बोलता येत नव्हती. सौम्या मात्र मित्र मैत्रिणींबरोबर कन्नडात सहज बोलत होती. लहान मुलांना ‘माझं चुकलं तर’ अशी धास्ती फारशी नसते त्यामुळे बर्याच गोष्टी लहान मुलं मोठ्यांपेक्षा पटकन शिकतात. सौम्याचही काहीसं तसच होतं. चटचट तयारी करून गायत्री सौम्याच्या नर्सरीत गेली. मायलेकी चालत चालत घरी पोहचल्या. गायत्रीचं हे घर अगदी ऐसपैस, प्रशस्त होतं. समोर मोठ्ठा व्हरांडा, अंगण. अंगणात गायत्रीने हौसेने दरवाज्याजवळ लावलेला फुलांचा ताटवा छानच बहरला होता. एका बाजूला तिने भाज्यांचा छोटासा वाफाही केला होता. त्यात कढीपत्ता, कोथिंबीर, मेथी असे तिचे प्रयोग चालत.    

      “आई, मृणालिनीने आज वर्गात एक गाणं म्हणून दाखवलं. ती म्युझिक क्लासला जाते तिथे शिकवलं. चारुकेशी सुद्धा जाते. मलासुद्धा त्या क्लासला जायचय” सौम्या सांगत होती. “अगं, त्या कर्नाटकी म्युझिक शिकतात. आपण काही इथे कायम रहाणार नाही. मग तू पुढे कसं कंटिन्यू करणार? काय उपयोग त्याचा?” आईचं म्हणणं सौम्याला काही फारसं पटलं नाही. “पण आत्ता तर आपण इथे आहोत ना! मला जायच्चचे” तिने हट्टाने म्हटलं. “बरं बघू. बाबाशी बोलूया मग ठरवू.” तिने तेवढ्यापुरता विषय टाळला पण ते विचार तिच्या मनात रेंगाळत राहिले. सौम्यासारखं आपल्यालाही सगळे बदल पटपट स्वीकारता आले असते तर किती बरं झालं असतं. आपणही मुंबई सारखा योगा क्लास इथे सुरु करायचा का.... पण भाषेची केवढी अडचण आहे...... इतके चांगले क्लासेस चालू होते आपले.... कशाला आपण अमितला हो म्हटलं इथे यायला. त्याचं ठीक आहे पण माझी ही दोन वर्षं वायाच आहेत ना! नाही म्हणायला इतक्या वर्षानी थोडी उसंत मिळाली. थोडी पुस्तकं वाचली, थोडं पेंटिंग केलं, हा बगीचा फुलवला ....... मग मी नक्की मिस काय करतेय? माझा योगा क्लास? पैसे? स्वतःची ओळख? ...... नुसते प्रश्न, अनुत्तरित प्रश्न ...... मनातल्या या द्वंद्वामुळे गायत्री कोमेजत चालली होती. अमितच्या नजरेतून हे सुटलं नव्हतं. पण त्याचाही नाईलाज होता.

      समोरच्या आय्यन्गारांची गाडी येताना दिसली म्हणजे सहा वाजले असणार. गायत्री घाईघाईने स्वयपाकाला लागली. त्या रात्री तिने अमितला अण्णा, तिचे आजोबा गेल्याचं सांगितलं, आणि माईला भेटण्याची तिची इच्छासुद्धा. कधी नव्हे ती अमितलाही सुट्टी मिळाली आणि दोन दिवसांतच ते तिघेही निघाले, आधी मुंबई आणि मग ते थेट कसालला तिच्या माहेरच्या गावी, माईला भेटायला गेले.   

     कसालचं ते कौलारू घर अजून अगदी तसंच होतं. अंगणात तुळशी वृन्दावन, ओसरी, गप्पा मारत, गोष्टी ऐकत बसायला अंथरलेली ओसरीतली चटई, मोठी पडवी, पडवीतला लाकडी झोपाळा. आतलं माजघर, तिथले दिवे ठेवण्यासाठी भिंतींत असलेले कोनाडे, माजघराच्या वरचं ते काचेचं कौल आणि त्यातून थेट आत येणारा सूर्यप्रकाश. माजघराच्या एका बाजूला असलेली मोठी देवाची खोली. त्या खोलीतला तो उदाबत्तीचा मंद सुगंध, समईचा मिणमिणता प्रकाश आणि शारंगधराच्या मूर्तीपुढे शांतपणे डोळे मिटून समाधीसारखी बसलेली माई......

     बाकी सगळे बाहेरच थांबले आणि गायत्री एकटीच देवघरात माईजवळ गेली. माईच्या खांद्याला तिने हलकासा स्पर्श केला. माईने डोळे उघडून पाहिलं. गायत्रीने तिने वाकून नमस्कार केला आणि मग घट्ट मिठी मारली. तीही काही म्हणाली नाही आणि हिनेही सांत्वन केलं नाही. अश्रूंच्या संवादात शब्द मुके झाले.

     चार दिवस माई बरोबर काढून आता परत जायची वेळ आली. आजची कासालची शेवटची रात्र. उद्या मुंबई आणि दोन दिवसांत पुन्हा नल्लूर. अमित बाहेर पडवीत झोपला होता. सौम्या आणि गायत्री आत खोलीत. रात्री सगळी निरवानिरव झाल्यावर माई गायत्रीच्या खोलीत आली. “ये, आज तुझ्या डोक्याला तेल लाऊन देते.” तिने प्रेमाने म्हटलं. “अगं माई आता काही माझे केस लांब नाहीयेत पूर्वीसारखे.” गायत्रीने म्हटलं. “नसूदे गं, डोक्याला थंड वाटतं” म्हणत माईने बोटानी गायत्रीच्या डोक्यावर तेल चोळायला सुरुवात केली. ते ऊनऊन खोबरेल तेल आणि माईचा तो प्रेमळ स्पर्श, आजीच्या कुशीत गायत्री पुन्हा लहान होऊन गेली. “कसं चाललंय तुझे नव्या जागी? क्लासेस कसे चाल्लेयेत तुझे?” माईने विचारलं. काही बोलायच्या ऐवजी गायत्री हुंदकेच देऊ लागली. “अगं काय झालं? जावईबापू नीट वागतात ना?” माईने काळजीने विचारलं. “हो गं, अमितचं काही नाही. मलाच काही करता येत नाहीये. मुंबईत व्यवस्थित क्लासेस होते माझे पण नल्लूरला काही नाही. तिथे सगळे कानडी, मी कशी बोलणार, कशी शिकवणार आणि अशा गावी शिकायला येणार तरी कोण! काही न करावं तर इतकं गिल्टी वाटतं की काय करत्येय मी आणि तिथे न जावं तर अमितच्या करीअरचं नुकसान होतं. अगदी कात्रीत सापडल्यासारखं वाटतं. असं वाटतं शेवटी माझी ओळख तरी काय आहे?” गायत्रीने एका दमात मनातलं सगळं सांगितलं. माईने प्रेमाने तिच्या डोक्यावर थोपटलं. ती म्हणाली “अगं, संसार म्हटला की थोडंफार इकडे तिकडे होणारच. थोड्या वर्षानी मागे वळून पहाशील तेव्हा तुला स्वतःलाच समाधान वाटेल की तू काही करायचं ठेवलं नाहीस. आणि हे सगळं काही कायम असंच रहाणार नाही. ती गोष्ट आठवते तुला गायत्री, चार आंधळे हातांनी हत्तीला चाचपून बघतात. सोंड धरणारा म्हणतो ही नळी आहे, कानवाला म्हणतो हे सूप आहे, पाय धरणारा म्हणतो हा खांब आहे, आणि शेपूट धरणारा म्हणतो ही तर दोरी आहे. माणसाच्या आयुष्याचंही तेच आहे ग. तू कोणाची मुलगी आहेस, कोणाची बायको, कोणाची आई, एक योगाभ्यास शिकवणारी शिक्षिकाही आहेस. पण ही सारी तुझी अंग आहेत. तू, तू अशी जी आहेस ती या सर्वांच्या पलीकडेसुद्धा आहेसच. खरी गोष्ट अशी आहे की हत्तीला स्वतःला खात्री हवी की तो हत्ती आहे. आंधळे म्हणतात म्हणून जर हत्ती स्वतःला नळी, खांब, सूप, दोरी असं काही समजू लागला तर काय होईल सांग! तू कोण आहेस ते लोकांच्या पारड्यात तोलू नकोस बाळा.... तुझं तू शोध. स्वान्तः सुखाय, स्वतःसाठी शोध. आणि असा शोध घेशील ना, तेव्हा खरच सांगते, तुला तुझी ओळख नक्की सापडेल, अगदी १०८ टक्के.” माईच्या शब्दांनी गायत्रीचं मन शांत झालं. लहान मुलीसारखं माईच्या मांडीत डोकं ठेऊन तिने माईचा हात पुन्हा आपल्या डोक्यावर ठेवला, तिने थोपटावं म्हणून. माई हसून तिला थोपटू लागली. नकळत सवयीने माईने भग्वद्गीतेतले श्लोक पुटपुटायला सुरुवात केली.

“निर्मान मोहा जितसङग दोषा, अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः

द्वंद्वैर्विमुक्ताः सुखदुःख सज्ञैर्गच्छन्त मूढाः पदम् अव्ययम् तत्”

झोप आणि जागृतीच्या सीमारेषेवर असलेल्या गायत्रीला अण्णाच आपल्या धीरगंभीर आवाजात श्लोकाचा अर्थ सांगतायत असं वाटू लागलं, “निराभिमानी, निर्मोही, कुसंगातीपासून मुक्त असा जो, ते शाश्वत तत्त्व जाणतो, जो इच्छांचा त्याग करतो, आपपर द्वैताच्या, सुखदुःखाच्या पार आणि मोहरहित असा जो असतो, तोच ते शाश्वत स्थान प्राप्त करतो”

       दुसर्या दिवशी सकाळीच मंडळी मुंबईला परत निघणार होती. सामान गाडीत ठेवणं वगैरे चालू होतं. अंगणात पारिजातकाचा सडा पडला होता. अंगणातल्या काळ्या मातीवर केशरी देठाची ती नाजुक पांढरी फुलं, जणू चान्दण्यांचा सडा. “आई, किती छान आहेत ना!” ती फुलं दाखवून सौम्याने गायत्रीला म्हटलं. “हो गं, आपल्या नल्लूरच्या घरीसुद्धा आहे पारिजात. अजून लहान आहे, मोठा झाला की त्याचासुद्धा असा सडा पडेल” गायत्रीने हसून म्हटलं. “पण आपण असणार का तिथे? आपण तर तिथून परत जाणार ना?” सौम्याने क्लासची गोष्ट आठवून म्हटलं. “तुला आवडत असेल तर राहू की” गायत्रीने असं म्हटल्याबरोबर गाडीत बॅग ठेवणार्या अमितने वळून तिच्याकडे पाहिलं. तिचा शांत, समाधानी चेहरासुद्धा त्या बहरलेल्या पारिजातासारखाच त्याला वाटला.  

 

डॉ. माधुरी ठाकुर

 

 
 
 
 
 
   
 

Tuesday, 16 May 2017

अंजलीची गोष्ट – पुन्हा तिघी


ऑपरेशन थिएटरची लिस्ट संपवून अंजली बाहेर आली. दुपारचे तीन वाजत आले होते. ऑपरेशन्स झालेल्या पेशंट्सना रिकव्हरी रूममध्ये हलवलं जात होतं. त्यांना दोन तासांनंतर बघून मगच घरी जावं की रजिस्ट्रारला कळवायला सांगावं, अशा विचारांत अंजली तिच्या केबीनकडे वळली. नर्सने चहा मागवून ठेवला होता. चहाचा घोट घेत तिने पर्समधून मोबाईल काढला. मोहना आणि शालिनी दोघींचेही मिस्ड कॉल्स दिसत होते. शालिनीचा कॉल आधी आलेला असला तरीही ती मोहनालाच आधी फोन करणार होती. त्यांच्या मैत्रीला तडा जाऊन आता एक वर्ष होत आलं होतं. त्यांच्या मागच्या भेटीनंतर, शालिनीचं, श्रीकांत, मोहन्याच्या नवर्याबरोबरचं अफेअर संपलं होतं पण मैत्री तुटली ती तुटलीच. शालिनीने अंजलीला दोन-तीनदा फोन करून बोलण्याचा प्रयत्न केला. पण अंजलीच्या मनातून ती इतकी उतरली होती की अंजली एकदाही शालिनीशी धड बोलली नाही. आणि बरोबरच होतं म्हणा. असेल पंधरा वर्षांची मैत्री पण दोघीनाही सख्ख्या बहिणीसारखी असणारी तिसरी मैत्रीण मोहना, तिच्याच नवर्याबरोबर म्हणजे.... डिसगास्टिंग !         शालिनीचा विचार झटकून तिने मोहनाला फोन करायला घेतला. “हाय, तू फोन केला होतास? सॉरी माझं ओटी (ऑपरेशन थिएटर) जरा लांबलं.” “हो, श्रुतीचे वडील गेले” मोहनाने एक सुस्कारा सोडून म्हटलं. “किती पटकन गेले! गेल्या महिन्यातच त्यांच्या आजाराचं कळलं होतं,” अंजली आश्चर्याने उद्गारली. “श्रुतीला कळवलं का? ती येतेय? कधी नेणारेत माहितीये?” अंजलीने एकामागे एक प्रश्न विचारले. “तिच्या भावाशी बोलणं झालं माझं. तो म्हणाला श्रुती आधीच निघालीये अमेरिकेहून. रात्री पोहोचेल. तोपर्यंत थांबतील.” मोहनाने उत्तर दिलं. “ओके. मी रियाला आईकडे सोडते आणि पोहोचते. चल भेटू.” “अंजू.....” मोहना अडखळत म्हणाली, “श्रुतीसाठी जायला हवं पण मला नको वाटतंय ग, तिथे शालिनी सुद्धा असणार.” “साहाजिक आहे मोहना पण आता जास्त महत्वाचं काय आहे सांग? शिवाय श्रीकांत तर नाहीच आहे ना मुंबईत!” अंजलीने मोहनाची समजूत काढली. शालिनीने संबंध तोडून टाकल्यावर श्रीकांत आता दुसर्या कोणाबरोबर तरी फिरतो असं अंजलीच्या कानावर आलं होतं आणि शालिनी पुन्हा पूर्वीसारखी एकटीच असते असंही.
        कर्टसी म्हणून अंजलीने शालिनीलासुद्धा कॉल केला. “अंजू..... कशी आहेस?..... कित्ती दिवसांनी.......” अंजलीने फोन केला याचा आनंद शालिनीच्या आवाजात लपत नव्हता. “श्रुतीच्या वडलांचं सांगायला फोन केला होतास का?” अंजलीने तुटकपणे विचारलं. “हो, मी निघतेच आहे. तू आणि मोहनासुद्धा याल ना? श्रुतीला सपोर्ट वाटेल. तसंही त्यांना फार नातेवाईकसुद्धा नाहीत.” शालिनीने म्हटलं. “हो, आम्ही दोघी येतोय. तू असणार म्हणून मोहनाला नको वाटत होतं पण मी सामाजावलय तिला” अंजलीने रुक्षपणे सांगितलं. “अंजू, मी चुकले गं.... किती वेळा सांगू मी चुकले, तू तुझ्या दुःखात होतीस, मोहना तिच्या संसारात बिझी, आई तिकडे गावी. मी खूप एकटी पडले, किती पोकळ वाटतं माहितीये.... तुमची मुलं तरी आहेत. मला तेही सुख नाही. त्या एकटेपणाच्या दुःखाच्या भरात चूक झाली माझ्याकडून. मला माझ्या चुकीचं खरच खूप वाईट वाटतं ग. तू मोहनाला सांग ना अंजू. ती माझ्याशी बोलतच नाही.” शालिनीचा रडवेला आवाज ऐकून क्षणभर अन्जलीचं मन कळवळलं. पण तरीही शालिनीच्या वागण्याला क्षमा होती का? शेवटी चूक ते चूकच ना! आपण तिला माफ केलं तर मोहनाला कसं वाटेल असाही विचार अंजलीच्या मनात येऊन गेला. “तुझा एकटेपणा मला समजतो. दुर्दैवाने आपल्या तिघीन्च्याही आयुष्यात हा एकटेपणा आहे शालिनी. पण मैत्रिणीच्या नवर्याबरोबर अफेअर करणं मला तरीही पटत नाही. जाऊदे, ही वेळ नाहीये हे सगळं बोलण्याची. चल घाईत आहे. ठेवते मी.” असं म्हणून अंजलीने फोन कट करून टाकला.
      घरी पोहोचल्यावर तिने आईला श्रुतीच्या वडलांची बातमी सांगितली. “आज शालिनीशीसुद्धा बोलले पाच मिनिटं” अंजली म्हणाली, “खूप सॉरी म्हणत होती.” तिने पुढे म्हटलं. “मग तू काय म्हणालीस?” आईने विचारलं. “मी काय म्हणणार! मी काही ठीक आहे, जाऊदे, असं नाही म्हटलं पण मला वाईट वाटलं खरं” अंजलीने खाली बघत म्हटलं. “अंजू, तुमची इतक्या वर्षांची मैत्री! अगदीच तोडून का टाकता एवढ्यासाठी?”
“एवढ्यासाठी म्हणजे? तूच म्हणत्येस ना एवढ्या वर्षांची मैत्री म्हणून मग अशा मैत्रिणीच्या नवर्याबरोबर असं?” अंजलीने चिडून विचारलं.
“अंजू, अगं चुका होतात कधीकधी, पण तिला पश्चात्ताप झालाय. इतके वेळा सॉरी म्हणतेय, बरं ती काही नेहेमी अशीच वागणार्यातली आहे असंही नाही. होतं गं एखाद वेळेस काही. आणि आपण कोण परफेक्ट आहोत सांग! आशिषच्या वेळी सावरायला तुला तिने किती मदत केली. आपल्या माणसाच्या दहा चांगल्या गोष्टी बघून, एखादी चूक, त्यातही पश्चात्ताप असेल तर माफ केली पाहिजे”
“मी माफ करेनही. पण मोहना? तिला काय वाटेल?”“मोहना खूप समजुतदार आहे. तिलासुद्धा नक्कीच कळेल.”        घरचं आटपून अंजली श्रुतीच्या घरी निघाली. आईचं बोलणं तिच्या मनात रेंगाळत होतं. नकळत तिचं मन भूतकाळात गेलं. या तिघी मेडीकलच्या पहिल्या वर्षाला होत्या, श्रुती त्यांना दोन वर्ष सीनिअर. शालिनीची होस्टेलवरची रूममेट म्हणून आधी शालिनीशी तिची मैत्री झाली आणि मग अंजली आणि मोहनाशीसुद्धा. श्रुतीचे वडील सरकारी ऑफिसमध्ये मोठ्या हुद्द्यावर होते. श्रुती त्यांची अगदी लाडकी होती. घरी सगळे तिला चिऊ म्हणायचे. तिला एक मोठा भाऊ होता, शार्दूल. तो त्यावेळी इंजिनीअरिंगला होता. त्यांच्या घरचं वातावरण फार कडक शिस्तीचं होतं. श्रुती नेहेमी बाबांना हे चालत नाही, ते चालत नाही, असं सांगत असे. पण ती फायनल इअरला असताना सर्जरीच्या एका लेक्चररबरोबर तिचं नाव जोडलं जाऊ लागलं. आधी उडत उडत कानावर येत होतं. पण मग श्रुती उघड उघड डॉक्टर भूषण शर्माबरोबर फिरू लागली. आणि फायनल इअरची परीक्षा झाल्यावर तर ती होस्टेल वरून बॅग पॅक करून त्याच्याबरोबर पळून गेली. लग्न झाल्यावर घरचे ऐकतीलच या विचाराने दोघे लग्न करून आले पण श्रुतीच्या वडलांनी तिचं तोंड बघायलासुद्धा नकार दिला. दहा वर्षानी मोठा, युपीचा भैया आणि स्वतःचा शिक्षक अशा माणसा बरोबर लग्न करून त्यांच्या मुलीने त्यांचं नाक कापलं होतं. त्यांनी जे तिचं नाव टाकलं ते टाकलंच. ते तिला भेटले नाहीतच पण त्यांनी पुढच्या पंधरा वर्षांत तिला कधी त्या घरी पाऊलही टाकू दिलं नाही. काही वर्षानी श्रुती भूषणबरोबर अमेरिकेला गेली. त्यांना मुलं झाली पण श्रुतीचं माहेर तुटलं ते कायमचंच.... भावाशी आणि आईशी तिचं बोलणं होत असे पण वडलांच्या नजरेआड. भारतात आली की ती बाहेर कुठेतरी त्यांना भेटत असे. रडून आता तिचे अश्रूही सुकले होते.
       पंधरा वर्षांनी श्रुती आज पुन्हा तिच्या माहेरी आली होती. मोजकेच नातेवाईक होते. इतक्या वर्षांनी वडलांना पाहिलं ते असं! तिच्या अश्रूंचा बांध फुटला. मोहना खरं तर श्रुतीहून लहान पण जात्याच प्रेमळ स्वभावाच्या मोहनाने श्रुतीला सावरलं, मायेने तिने तिला थोपटलं. श्रुतीला रडताना बघून शालिनी सुद्धा मैत्रिणीला सावरायला पुढे झाली. ती श्रुतीजवळ आल्याबरोबर मात्र मोहना तिथून दूर सरकली आणि नकळत अंजलीही. घरी करण्याचे विधी आटपून पुरुष मंडळी बॉडी घेऊन गेली. आता खोलीत श्रुती आणि या तिघीच उरल्या. निघता निघता श्रुतीच्या दादाने तिच्या हातात एक मोबाईल ठेवला. “चिऊ, बाबांनी जायच्या आधी दोन दिवस मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, की इतकी वर्ष मी चिऊला येऊ दिलं नाही. पण आता तिला बोलावून घे. ती नक्की येईल. भेट होईल असं वाटत नाही पण तिला माझा निरोप दे. तुझा फोन लागला नाही म्हणून त्यांना तुला सांगायचं होतं ते यात रेकॉर्ड केलं आहे. चिऊला लगेच ऐकव तोपर्यंत मला मुक्ती नाही म्हणाले होते.” रेकॉर्डिंग सुरु करून तो निघून गेला. श्रुतीला अवघडल्यासारखं व्हायला नको म्हणून तिघी जायला उठल्या पण श्रुतीने शालिनीचा हात धरून तिला थांबवलं. हो ना करत तिघीही थांबल्या.
        रेकॉर्डिंग सुरु झालं. श्रुतीच्या वडलांचा तोच परिचित धीरगंभीर आवाज. “चिऊ, काय सांगू आणि कुठून सुरु करू. काय तोंडाने सांगू! किती दुखः दिलं मी तुला. तुझ्या एका चुकीसाठी केव्हढी शिक्षा दिली मी. तुला, तुझ्या आईला, शार्दूलला, भूषणला आणि मला स्वतःलासुद्धा. तू माझी इतकी लाडकी मग इतका कठोर कसा झालो मी! फार आशा लावली होती मी तुझ्यावर. तुझ्या पळून जाण्याने, लग्नाने, झालेल्या अपेक्षाभंगाचं, अपमानाचं दुःख पचवलच नाही मी. सतत राग केला की रागाचं सोंग केलं.” एवढ्या बोलाण्यानेसुद्धा त्यांना धाप लागली होती. पण अजून उशीर करून चालण्यासारखं नव्हतं. ते नेटाने बोलत राहिले. “तू लहान होतीस पण मी तर मोठा होतो ना, मग मी मोठ्यांसारखा का नाही वागलो! लहान वयात आमचे आबा गेल्यावर कुटुंबात मोठा, भावंडांत मोठा म्हणून जबाबदारीची झूल लवकर अंगावर घेतली. हळूहळू यशही मिळत गेलं. तसतसा माझा अहंकार वाढतच गेला. मग मला हे चालत नाही, ते आवडत नाही असं स्वतः भोवती तारांचं कुंपणच तयार करून घेतलं. आणि तुम्हालाही बळजबरीने त्या कुंपणात डाम्बून ठेवलं. स्वतःला नेहेमी इतरांपेक्षा वरचढ मानत गेलो. माझ्या भोवतीच्या प्रत्येकाची प्रत्येक चूक मी दाखवली. चुकीला क्षमा असते हे माझ्या पुस्तकात कुठे नव्हतंच. तुझी बाजू घेऊन भांडताना तुझी आई म्हणाली होती, “तुम्ही क्षमा कराल तरच परमेश्वराची क्षमा तुमच्यापर्यंत येईल” तेव्हा मी ते धुकावूनच लावलं. पण आता मला कळतंय की एकदा तुला बघायला, एकदा तुला भेटायला, तुला सांगायला की तुझ्या आठवणी शिवाय एक दिवस नाही गेला, मी काहीही करेन. पण आता ते शक्यच नाहीये. मी खूप वेळ लावला चिऊ, मी खूप वेळ लावला. तुझी आई नेहेमी म्हणते चिऊसुद्धा तुमच्या सारखीच हट्टी आहे. थोडा हट्ट ठीक आहे पण माझ्यासारखे grudge मनात नको ठेऊ. आपलं आयुष्य जे विस्कटलं, त्याला कारण तुझी चूक नाही तर माझं हे सल, आकस धरून रहाणं होतं. रोग गेला तरी जसे देवीचे व्रण रहातात, चेहरा विद्रूप करून टाकतात, तसे हे सल आपलं आयुष्य कुस्करून गेले. मी कायम राग धरून ठेवला त्यामुळे मला मागायचा काही हक्क नाही तरीही हा बाबा तुझ्याकडे माफी मागतो आहे. चिऊ, या गेल्या पंधरा वर्षांबद्दल गिल्ट तर अजिबात वाटून घेऊ नकोस, मोकळ्या मनाने मला निरोप दे आणि जमलं तर आपल्या बाबाला क्षमा कर, करशील ना?”
      रेकॉर्डिंग संपलं होतं. श्रुती हुंदके देऊन रडत होती. शालिनीने तिला मिठी मारली. मोहना आणि अंजलीही तिला येऊन मिळाल्या. अंजलीने मोहनाकडे पाहिलं. श्रुतीबरोबर तिने शालिनीलासुद्धा कवेत घेतलं होतं. डोळ्यातल्या पाण्याने मनातले सारे सल धुऊन टाकले होते.
 डॉ. माधुरी ठाकुर  

Tuesday, 2 May 2017

तोड पिंजरा, उड पाखरा


गेला एक तास या आडरस्त्यावर त्यांची गाडी चालली होती. "साहेब पत्ता बरोबर आहे ना ?" ड्रायव्हर हरिहरने विचारलं. "हो रे, हाच रस्ता सांगितलाय." आदित्य म्हणाला खरा पण मनातून त्यालाही खात्री नव्हती. आपल्या अक्ख्या आयुष्याचाच रस्ता चुकलाय असं त्याला वाटून गेलं आणि तेवढ्यातच समोर सायोची स्कूटी रस्त्याच्या कडेला त्याला दिसली.

 आता पुढे रस्ता संपलाच होता. फक्त पायवाट होती. आदित्य आणि हरिहर पायवाटेवरून चालू लागले. पाच दहा मिनीटांत ते एका मोठ्ठया बैठ्या घरासमोर आले. ते ओसरीपर्यंत पोहोचतात तोच आतून एक  वयस्कर गृहस्थ बाहेर आले. "आम्ही सायो मॅडमना भेटायला आलोय" आदित्यने सांगितलं. "कोण सायो?" त्या माणसाने उलट विचारलं. "इथे सायो नाही का आलीये? मुंबईहून?" आदित्यने चक्रावून  विचारलं. आता त्याला आपण चुकलोच आहोत असं वाटू लागलं. पण मग तिथे सायोची स्कूटी दिसली ती! "ओह... संयुक्ताताई.... अच्छा अच्छा... या ना, या बसा," त्या गृहस्थांनी आदित्यला एक ऑफिससारख्या खोलीत नेलं "मी बोलावून आणतो त्यांना" म्हणून ते निघून गेले.

 आदित्य अवघडून बसून राहिला. सायोला आपण आलेलं मुळीच आवडणार नाहीये याची त्याला खात्रीच होती. पण आता सायो या आडजागी कशाला आली असेल ही त्याची उत्सुकताही चाळवली गेली होती. एका एस्कॉर्टला शहरापासून एवढ्या लांब या खेड्यात काय काम असेल! एस्कॉर्ट म्हणजे तरी काय, सायो ज्या एजन्सीमधून आली होती ती एस्कॉर्ट एजन्सी म्हणजे पॉश नावाखाली मुली पुरवण्याचा धंदाच होता आणि आदित्य सायोचा रेग्युलर कस्टमर झाला होता.

 'बावीस तारखेला पॅरिसचं शूट संपवून परत येईन सांगितलं होतं हिला तरी ही इकडे कुठे येऊन बसली' वैतागून त्याच्या मनात विचार आला. क्षणात स्वतःच्या विचाराचं त्यालाच हसू आलं. तो येणार म्हणून वाट बघत बसायला ती त्याची लग्नाची बायको थोडीच होती! आणि लग्नाची बायको जिला करणार होतो ती तरी कुठे थांबली! अचानक निघून गेली. झर्रकन साक्षीबरोबरचा त्याचा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर येऊन गेला. दोन वर्षांपूर्वीची त्यांची पहिली भेट, हळुवार फुलणारं प्रेम, तिचं त्याच्याबरोबर त्याच्या फ्लॅटमध्ये येऊन रहाणं, पंख लावून उडालेले दिवस आणि रातराणीसारख्या बहरलेल्या रात्री आणि मग अचानक पंख्याला लटकलेली साक्षी! ते दृश्य आठवूनही त्याच्या अंगाला कंप सुटला. त्याने खिशातून सिगारेट काढून पेटवली आणि एक झुरका घेतला. साक्षी मनोरुग्ण होती, तिला स्किझोफ्रेनिया होता. अश्या रोग्याला म्हणे वेगवेगळे आवाज ऐकू येत राहातात. अस्तित्वात नसलेले लोक त्यांच्याशी काही बोलतायत, काही सांगतायत असे भास होत रहातात. मग सहा महिन्यांत आपल्याला कळलं कसं नाही! नाही म्हणायला ती कधी कधी लोक तिच्याबद्दलच बोलतायत, कुजबुजतायत असं सांगायची पण माझ्यासारख्या प्रसिद्ध मॉडेलची गर्लफ्रेंड म्हटल्यावर अशी थोडी इन्सिक्युरिटी असणारच असं वाटून आपण ते कधी गंभीरपणे घेतलंच नाही.... साक्षीच्या मृत्यूला आपला हलगर्जीपणा जबाबदार आहे का हा प्रश्न त्याच्या मनात राहून राहून उठत असे. त्या धक्क्यातून, त्या दुःखातून सावरण्यासाठी आदित्यने काय नाही केलं. ड्रिंक्स, ड्रग्स आणि ड्रीमगर्ल. शेवटी ड्रीमगर्ल एस्कॉर्ट सर्व्हिसेसकडून सायो आली आणि तिच्या बरोबर आदित्यला थोडं बरं वाटू लागलं.

 "आदि ....." सायोच्या हाकेने आदित्यची तंद्री भंगली, "तू इथे!" तिच्या सुरात तिची नाराजी स्पष्ट होती. "इथे का आलास? मी सुट्टी घेऊन आलेय."

"हो, मी फक्त तुला भेटायला आलोय, सायो. दोन दिवसांनी पुन्हा महिनाभर बाहेर जातोय शूटसाठी." आदित्य ओशाळलेल्या सुरात म्हणाला. "बरं चल" म्हणत सायो आदित्यबरोबर बाहेर पडली. हरिहरला थांबण्याचा इशारा करून ते दोघे पायीच निघाले. ते आदिवासी लोकांचं छोटंसं खेडं होतं. चालत चालत ते दोघे वस्तीपासून थोडे लांब एका डोंगराजवळ आले. समोर एक छोटासा ओढा वहात होता. एका मोठ्या खडकावर सायो बसली. आदित्य तिच्या बाजूला जाऊन बसला. तिचा हात हातात घेत त्याने विचारलं, "तुझं नाव संयुक्ता आहे? आज मी सायो विचारलं तर त्यांना कळलंच नाही".
सायोने मान हलवली. "हो, माझं नाव संयुक्ताच आहे ... होतं" शून्यात बघत तिने उत्तर दिलं.

"इथे नेहेमी येतेस? हे तुझं गाव आहे?"

 "अंहं, नाही.... इथे अनाथालय आहे. या भागात बरीच बाळं, जास्त करून मुली टाकून दिल्या जातात. या अनाथालयात त्यांना सांभाळतात. त्यांना आपल्या पायावर उभं करण्याचा प्रयत्न करतात."

 "तू काय करतेस इथे येऊन?" आदित्य चकित झाला होता. सायोसारखी मुलगी असं काही करत असेल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.
"मी त्यांना होईल ती मदत करते. शहरातून मी त्यांच्यासाठी पुस्तकं, कॉम्प्युटर , कपडे मला जे परवडेल ते घेऊन येते. त्यांना इंग्लिश शिकवते. कॉम्प्युटर  वापरायला शिकवते, त्यांच्याबरोबर गप्पा मारते. काय जमेल ते करते. इथे मी त्यांच्यासाठी येत नाही. इथे मला सायो सोडून संयुक्ता होता येतं. म्हणून मी येते"

 "तू करत्येस हे सगळं चांगलंच आहे पण तरीही शेवटी आपलं स्वतःचं दुःख आपल्यापाशी रहातंच ना?" आदित्यने अगतिक होऊन विचारलं.

 "आदि, माझं पूर्ण नाव संयुक्ता पुंडलिक पाध्ये आहे. पुजार्याची मुलगी. घरच्यांबरोबर शहर बघायला आले, हात सुटला आणि मी चुकले. भलत्या लोकांच्या हातात सापडले आणि संयुक्ताची सायो झाले. माझे वडील मंदिरात कीर्तन करायचे. तेव्हा अर्थ कळत नव्हता, फक्त शब्द लक्षात राहिले. ते सांगायचे घटाकाश आणि मठाकाश, घड्यातलं आकाश म्हणजे पोकळी आणि मठातलं आकाश म्हणजे बाहेरचं अवकाश, आपल्याला वाटतं हे वेगळं आणि ते वेगळं, पण दोन्ही पोकळीच, दोन्ही एकच. दोन्ही एकमेकांशी जुळलेलंच आहे. मीसुद्धा या मुलांशी त्यांच्या सुखदुःखांशी जुळलेलीच आहे. ह्यांच्यासाठी काही करताना मी माझ्याच जखमेवर फुंकर घालत्येय असं वाटतं."

 "इतक्या कठीण परिस्थितीतही तू तुझा मार्ग शोधलास. मला मात्र अजूनही ते जमत नाहीये. पैसा प्रसिद्धी सगळं असूनही या निराशेच्या, दुःखाच्या पिंजर्यात अडकून गेलोय मी." आदित्य हताश होऊन उद्गारला.

 "तूसुद्धा तुझा मार्ग शोध ना आदि..... तुला स्वतःची ओळख आहे. ब्रँड इमेज आहे, पैसा आहे. एक साक्षी मनाच्या रोगाने गेली पण अश्या कित्ती साक्षी अजून जिवंत आहेत. त्यांच्यासाठी काही कर ना" सायोने  त्याचा हात घट्ट धरून सांगितलं.
अंधार पडू लागला तसे ते दोघे परत उठून अनाथालयाकडे आले. "गाडी आणि हरिहरला तुझ्यासाठी ठेऊन जाऊ?" आदित्यने विचारलं. "तू स्कूटी वरून गेलास तर उद्या पेपरमध्ये न्यूज येईल, मी येईन आपली आपण." सायोने हसत सांगितलं.

दुसर्या दिवशी ठरल्याप्रमाणे आदित्य शूटसाठी निघून गेला. पण जेव्हा महिन्याभराने तो सायोला परत भेटला तोपर्यंत त्याने बरंच काही केलं होतं. त्याच्या हातात एक एन्व्हलप होतं. ते त्यांने संयुक्ताला दिलं. तिने उघडून बघितलं तर आत एक बँकेचं कार्ड, पासबुक, पासपोर्ट अश्या गोष्टी आणि काही पैसे होते. 
"तुझ्या एजन्सीशी बोललोय मी. त्यांचा अकाउंट सेटल झालाय. तू हवं तिथे जाऊ शकतेस. हवं ते करू शकतेस. यू आर फ्री. या बँक अकाउंटमधे तुला वर्ष दोन वर्ष सहज पुरतील इतके पैसे आहेत"
संयुक्ता थक्क झाली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या, "हे सगळं मी कसं घेऊ? मी परतफेड कशी करणार?" तिने हुंदके देत विचारलं.
आदि हळुवारपणे म्हणाला, "फुकट नाहीये हे, पहिल्यांदी कोणी मला दिशा दाखवली आहे, फक्त सांगून नाही, कृतीतून! गुरुदक्षिणा आहे ही".
"तुला मी तुझ्याकडे राहायला हवंय?" संयुक्ताने विचारलं. तिच्या सध्याच्या आयुष्यापेक्षा तेही बरंच होतं पण शेवटी ती एक प्रकारची लाचारी , गुलामगिरी झालीच असती.

 "मला खूप आवडेल तू माझ्याबरोबर राहिलीस तर. पण मला माहितीये तुझा आनंद त्यात नाहीये. इथे राहिलीस तर 'सायो'च होऊन अडकशील. तू संयुक्ता आहेस, तुझ्या आकाशात भरारी घे. अगदी मोकळेपणाने. मागे वळूनसुद्धा पाहू नकोस आणि थांबू तर जराही नकोस कारण थांबलीस तर मी तुला धरूनच ठेवीन आणि कधीच जाऊ देणार नाही....." आपल्या हातांनी संयुक्ताने त्याचे डोळे पुसले आणि त्याचा निरोप घेऊन ती निघाली.

 सहा महिने झाले होते. संयुक्ताने आता स्वतःला त्या अनाथालयासाठी, तिथल्या मुलांसाठी वाहून घेतलं होतं. एक दिवस ती मुलांना जेवण वाढत होती तेवढ्यात तिथे काम करणारी मालती धावत तिला सांगायला आली. "ताई तुमचे ते शहरातले पाहुणे टीव्ही वर आहेत." संयुक्ता धावत टीव्ही असलेल्या खोलीत आली. ती जनहितार्थ पद्धतीची जाहिरात होती. संयुक्ता पोहोचेपर्यंत अर्धी जाहिरात आधीच झाली होती. आता आदित्यचा तोच देखणा चेहरा स्क्रीनवर होता. तो सांगत होता, "शरीरासारखंच मनही कधी आजारी पडतं. मनाचे रोग ओळखा , त्यांच्याबद्दल मोकळेपणाने बोला, उपचार घ्या. मनोविकारांबद्दलच्या मार्गदर्शनासाठी या नंबरवर विनामूल्य संपर्क करा - संयुक्ता फौंडेशन" डबडबलेल्या डोळ्यांनी संयुक्ता पहातच राहिली. दोघांनीही पिंजरे तोडले होते. पाखरांनी भरारी घेतली होती.

डॉ. माधुरी ठाकुर

https://drmadhurithakur.blogspot.co.uk/