Sunday 19 February 2017

सांगाती (अनुभव)



हे होणार हे मला माहीत होतं पण ती वेळ इतक्या लवकर येईल असं वाटलं नव्हतं. तीन वर्षांपासून जिच्याशी माझी घट्ट मैत्री झाली अशी माझी सखी..... ती आता आमचं शहर सोडून जाणार होती. तिचा नवरा दुसर्या शहरी जॉब निमित्त गेला तेव्हा मागोमाग तीसुद्धा जाणार हे गृहीतच होतं. पण एवढ्या लवकर ती वेळ येईल असं वाटलं नव्हतं.

तीन वर्षांपूर्वी एका कॉमन मैत्रिणीच्या घरी आम्ही भेटलो. 'समानशीलेषु सख्यम' या नात्याने आमची वेव्हलेंग्थ लगेच जुळली. ती माझ्यासारख्याच मोकळ्या स्वभावाची, तशीच इमोशनल आणि तेवढीच इंपेशण्ट! तिच्यामध्ये मला, दहा वर्षांपूर्वीची मी वारंवार दिसे. पण माझ्याकडे दहा वर्षांपूर्वी नसलेली एक गोष्ट 'हि'च्यामध्ये या लहान वयातही आहे ती म्हणजे 'सद्गुरुभक्ती'. ती नानासाहेब धर्माधिकारी यांच्या बैठकीला जाणारी आणि मी बापूभक्त. रस्ता वेगवेगळा पण डेस्टिनेशन सेम, सद्गुरुचरण!

माझ्या धाकट्या मुलाला बरं नसताना रात्री तीनला मी तिला हक्काने बोलावून घेतलं होतं , हॉस्पिटलमध्ये माझ्या मुलाला नळ्या लावलेल्या बघताक्षणी तिच्या डोळ्यात पाणी आलं होतं.

मैत्री नव्हे निव्वळ देणे
मैत्री म्हणजे वाटून घेणे
मला लागता तुझिया नयनी
आधी अश्रू येणे.....

तर अशी ही माझी सखी आता दूर जाणार होती. मला धाकटी बहीण असती तर ती सासरी जाताना मला जसं वाटलं असतं तसं मला वाटलं.

ग्लोबल व्हिलेजच्या नादात आपण किती सारं गमावतोय या विचाराने माझं मन सुन्न झालं. सारी नातीगोती भारतात ठेऊन मी इथे दूर आले आहे. इथे नवनवीन लोक भेटतात. कधी तारा जुळतात, मैत्र निर्माण होतं आणि होता होता एका लाटेने परत ओंडके दूर व्हावेत तसे सगळे इकडे तिकडे विखुरतात. माझ्या हृदयाचा एक एक तुकडा सोबत घेऊन जातात.

 मुलं रडत रडत नेहमी आईकडेच जातात तशीच सुन्न झाले की मीसुद्धा बापूंच्या फोटोपुढे जाते. मी रडत त्यांना म्हटलं, "तुम्ही असे कसे निष्ठुर होता? तुमच्या अश्या करण्यामुळे मला नवीन मैत्री करणं नको वाटतं. माझा जीव गुंतणार आणि तुम्ही ताटातूट करणार. काय अर्थ आहे याला!"

बापू फोटोतच हसून म्हणाले, "अजूनही तुला कळत नाहीये, दर वेळी रडत रडत माझ्याच कडे येतेस, प्रत्येक गोष्ट सांगायला, प्रत्येक गोष्ट मागायला..... आणि तरीही तुझा खरा सांगाती, खरा सोबती कोण आहे ते ओळखत नाहीस.....

सांगाती आहे मी तुमचा निश्चित
तीनही काळी , तीनही लोकांत
विसरलात जरी तुम्ही मज क्वचित
मी नाही विसरणार तुम्हांस निश्चित"

उन्हाचा ताप असह्य व्हावाआणि अचानक वार्याची थंडगार झुळूक अंगावर यावी, तसं मला वाटलं. सद्गुरू चरणांना आठवत छोट्या बाळासारखी मी झोपी गेले. झोपेतही तोच अनाहत नाद माझ्या हृदयात गुंजत होता "खरंच सांगतो बाळांनो मी तुम्हाला कधीच टाकणार नाही.... येस्स"

6 comments:

  1. छान, मैत्रिणीची ताटातूट, विरह आणि बापुं बद्दल तुझी अपार श्रद्धा या लिखाणात दिसते 👌🙏

    ReplyDelete
  2. Chan madhuri!!
    Destination एकच सद्गगुरू चरण , आंत: करण ही एकच
    मग विरह नाहीच, fact wavelength.😊

    ReplyDelete

  3. बापू फोटोतच हसून म्हणाले, "अजूनही तुला कळत नाहीये, दर वेळी रडत रडत माझ्याच कडे येतेस, प्रत्येक गोष्ट सांगायला, प्रत्येक गोष्ट मागायला..... आणि तरीही तुझा खरा सांगाती, खरा सोबती कोण आहे ते ओळखत नाहीस..... 🙏🙏🙏

    ReplyDelete
  4. माधुरी तुझे लेखन मनाला स्पर्शून जाते . खूप छान .

    ReplyDelete
  5. तुम्हा सर्वांच्या प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक आभार.... समोरून मिळालेली दाद ही नेहेमीच उत्साह वाढवते

    ReplyDelete